Team My Pune City – दिवाळीच्या पाच दिवसांच्या कालावधीत (Pune) (२० ते २४ ऑक्टोबर) शहरात एकूण ७५० टन अतिरिक्त कचऱ्याची विल्हेवाट महापालिकेने लावली. नरक चतुर्दशीपासून ते भाऊबीजपर्यंत दररोज सरासरी १५० टनांनी कचऱ्याचे प्रमाण वाढले होते. या काळात फटाक्यांचा कचरा, भेटवस्तूंचे कागद, तसेच नागरिकांनी घर साफसफाईदरम्यान टाकलेल्या जुन्या वस्तूंमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेच्या माहितीनुसार, सामान्य दिवसांत शहरातून २५०० ते २६०० टन कचरा तयार होतो, मात्र दिवाळीच्या दिवसांत हे प्रमाण वाढून २९०० टनांच्या घरात गेले. यामध्ये सुका कचरा — जसे की गिफ्ट रॅपर्स, फटाक्यांचे अवशेष, पॅकेजिंग मटेरियल — यांचे प्रमाण अधिक होते.
दिवाळीच्या काळात कचरा साठून राहू नये म्हणून घनकचरा विभागाने विशेष नियोजन केले होते. रोजच्या कचरा संकलनात खंड पडू नये, यासाठी अतिरिक्त गाड्या आणि कर्मचारी तैनात करण्यात आले. कर्मचाऱ्यांनाही दिवाळी सण साजरा करता यावा म्हणून शिफ्टनिहाय व्यवस्था करण्यात आल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
Crime News: एस.टी. बस प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणार्या 3 महिला जेरबंद
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
कदम म्हणाले, “शहरातील कोणत्याही भागांत सणाच्या काळात कचरा रस्त्यावर पडून राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. महापालिका आयुक्त स्वतः विविध भागांतील पाहणीसाठी फिरत होते. त्यामुळे यंदा कोणतीही अडचण आली नाही.”
सणापूर्वी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर जुन्या वस्तू – गाद्या, फर्निचर, गोधड्या, उशा – फेकून दिल्या. अनेकदा या वस्तू नदीपात्राजवळ किंवा रस्त्यावर टाकल्या जातात. त्यामुळे यंदा महापालिकेने “विशेष कचरा संकलन मोहीम” राबवली. या मोहिमेतून नागरिकांकडून अशा वस्तू थेट गोळा करून स्वच्छता राखण्यात आली.
दिवसवार कचरा संकलनाचे आकडे पुढीलप्रमाणे:
२० ऑक्टोबर: २७८१ टन
२१ ऑक्टोबर: २१२७ टन
२२ ऑक्टोबर: २३९६ टन
२३ ऑक्टोबर: २८३९ टन
२४ ऑक्टोबर: २९०८ टन


















