Team My Pune City – हडपसर येथील रामटेकडी परिसरात (Pune)लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक वादातून एका तरुणाचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मृताचे नाव जितेंद्र परमेेश्वर ठोसर (वय ३५, रा. रामटेकडी, हडपसर) असे आहे. आरोपी खन्ना सिंग अजितसिंग कल्याणी (वय ४५, रा. साई मंदिर, रामटेकडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जखमींमध्ये वंश ठोसर, नीळावती देगडे, अविनाश देगडे, अनीता ठोसर, अश्विनी ठोसर आदींचा समावेश आहे.
Crime News: एस.टी. बस प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणार्या 3 महिला जेरबंद
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनानिमित्त ठोसर कुटुंबीय रामटेकडी येथील त्यांच्या परिसरात पूजा करत असताना आरोपींपैकी एकाने यश ठोसर (वय ३०, रा. रामटेकडी) यांच्या चायनीज खाद्यगाडीसमोर फटाका फेकला. याबाबत यश यांनी आक्षेप घेताच आरोपी खन्ना सिंग आणि त्याचे साथीदार संतापले. त्यांनी पाइप व धारदार शस्त्रांनी ठोसर व देगडे कुटुंबीयांवर हल्ला चढविला.
हल्ल्यात वंश ठोसर आणि जितेंद्र ठोसर या दोघांना भोसकण्यात आले, तर नीळावती देगडे व त्यांचे पती अविनाश देगडे यांना लोखंडी पाइपने मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या जितेंद्र ठोसर यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत फटाके फोडण्याच्या वादातून हा तणाव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ठोसर आणि देगडे कुटुंबीयांनी आरोपी खन्ना सिंगच्या मुलगा आणि पुतण्याशी झालेल्या वादाविषयी विचारणा केली होती, त्यावरूनच गटात संघर्ष पेटला.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब तपासणीसाठी घेतले असून, फरार आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेने रामटेकडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



















