Team My Pune City – पुण्याकडे प्रवास करणा-या एका महिलेशी(Pune ) मोटारसायकलवर प्रवास करण्याचा आमिष दाखवून बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी जाक्या चव्हाण (वय 30, रा. लिंगाळी, ता. दौंड) यास अटक केली आहे. हा आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडीचा गुन्हा नोंद आहे.
ही घटना दि. 10 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजता पुणे–सोलापूर महामार्गावर माळद गावाजवळील रेल्वे पुलाजवळ घडली. फिर्यादी महिला भिगवण येथे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत उभी असताना आरोपी चव्हाण तेथे आला. ओळख असतानाही त्याने तिला पुण्यापर्यंत नेण्याचे आमिष दाखवले.
महिलेने त्याच्या सांगण्यावरून मोटारसायकलवर बसल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर आरोपीने वाहन थांबवले. माळद गावाजवळील झाडाजवळ नेऊन तिला जबरदस्तीने खेचले, तिच्या जिवाला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर घटनास्थळावरून पसार झाला. भयभीत अवस्थेत पीडित महिला तात्काळ भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झाली व तिने घटनेची तक्रार नोंदवली.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी तातडीने भिगवण, दौंड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांची नियुक्ती करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पीडितेच्या सांगण्यावरून आरोपीचा स्केच तयार करण्यात आला आणि भिगवण तसेच दौंड परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना आरोपीचा माग काढण्यात यश आले. अखेर आरोपी चव्हाण यास लिंगाळी गावातून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Crime News: एस.टी. बस प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणार्या 3 महिला जेरबंद
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिलिमकर, दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार आणि भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी आणि संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



















