भरत नाट्य मंदिराच्या शारदीय संगीत नाट्य महोत्सवाला सुरुवात
Team My Pune City –संगीत नाटकांची परंपरा जोपासून ती रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य भरत नाट्य संशोधन मंदिर करीत आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काढले.
सुमारे 131 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शारदीय संगीत नाट्य महोत्सवाचे उद्घाटन आज (दि. २४) डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन करून झाले. त्या वेळी ते बोलत होते.
Pune: जोडी तुझी माझी’मध्ये रंगली गप्पा-गाण्यांची खुमासदार मैफल
भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, ॲड. शंतनू खुर्जेकर, भरत नाट्य संशोधन मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे उपस्थित होते.
नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल लिखित तीन नाटकांचा महोत्सव यंदा आयोजित करण्यात आला असून महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संगीत मृच्छकटिक नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. शनिवार, दि. 25 रोजी संगीत शारदा तर रविवार, दि. 26 रोजी संगीत संशयकल्लोळ हे नाटक सादर होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
रशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भरत नाट्य मंदिराचे कलाकार ईशान जबडे यांच्या ‘पंचामृत’ या मराठी लघुपटाला तृतीय क्रमांक मिळाला. या निमित्त त्यांचा डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले.




















