Team My Pune City –पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा या वारसा स्थळी नमाज पठण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवार वाड्यावर जाऊन आंदोलन केलं. गोमूत्र शिंपडून ती ‘पवित्र’ केल्याच सांगितले. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच यापुढे असले प्रकार आम्ही काहीही झालं तरीही खपवून घेणार नाही असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
मेधा कुलकर्णींची पोस्ट ?
मेधा कुलकर्णी यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे की, शनिवारवाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे !
तसंच त्यांनी चलो शनिवार वाडा! अशी हाकही दिली आहे. रविवार, 19 ऑक्टोबर 2025, शनिवार वाडा, कसबा पोलीस चौकीसमोर, सायंकाळी 4 वाजता असं सांगत त्यांनी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे. पुण्याचे वैभव – शनिवार वाडा, ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार. हा प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय! पुणे प्रशासन नक्की करते काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? असे प्रश्नही त्यांनी विचारले आहेत. चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि शिव वंदना करून आपल्या संस्कृतीचा सन्मान जपूया! अशी हाक त्यांनी दिली आहे.
pic.twitter.com/EObcXMZ6Rt
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, शनिवार वाड्यात जिथे आम्ही आलो आहोत याच ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं. त्या जागेचं शुद्धीकरण आम्ही शिववंदना करुन करणार आहोत. हिंदू शक्ती या ठिकाणी एकवटली आहे. आपण पुढच्या काळातही अशीच आंदोलनं केली पाहिजेत. शनिवार वाडा हे ऐतिहासिक ठिकाण आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला ते ऐतिहासिक ठिकाण हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे. मुघलांचा नाश या ठिकाणी झाला. तेच इथं येऊन नमाज पठण करत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे. तुम्ही ज्या नाईलाजास्तव हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे तुम्ही पुन्हा हिंदू धर्मात परत या. त्याच धर्मात राहायचं असेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा. सार्वजनिक ठिकाणी किंवा ऐतिहासिक ठिकाणी येऊन नमाज पठण करु नका. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका. यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही. पतित पावन संघटना या ठिकाणी शुद्धीकरण करुन शिववंदना गाणार आहे. तसंच पूर्वी या ठिकाणी माघी गणेश उत्सव साजरा होत होता तो पुन्हा सुरु करावा अशी मागणी मी करते आहे असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे