Team My Pune City –सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या(Pune) मालकीच्या SHND जैन बोर्डिंग हाऊसच्या विक्री व्यवहारावरून पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. माजी आमदार रविंद्र धंगेकर आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी याप्रकरणी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट आरोप केल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणात उडी घेत, सरकारकडे चौकशी आणि व्यवहारावर त्वरित स्थगितीची मागणी केली आहे.खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नेमकं कोणाचं हित साधलं जाणार? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सन १९५८ मध्ये पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत ट्रस्टने ही जागा शैक्षणिक आणि धार्मिक हेतूने खरेदी केली होती. मात्र, आज तीच जागा विकून मूळ उद्देशाशी प्रतारणा केली जात आहे, हे अत्यंत चिंताजनक आहे.”
Kondhwa: कोंढवा पोलिस कारवाईदरम्यान ड्रग ट्रॅफिकरचा मृत्यू
Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी
त्या पुढे म्हणाल्या , माननीय धर्मदाय आयुक्त, मुंबई यांच्या समोर या संदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित असताना एवढ्या घाईघाईने या जागेच्या विक्रीचा निर्णय घेण्यात का आला? हा प्रश्न समाजाला पडला आहे. सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या घटनेत कुठेही जागा विक्रीबाबत तरतूद केलेली नाही. तरीसुद्धा या जागेच्या विक्रीस परवानगी देण्यात आली, यामागे नक्की कोणाचे हितसंबंध आहेत हे उघड व्हायला हवे. ट्रस्टकडे हॉस्टेल दुरुस्तीकरिता निधी नसल्याचे कारण देण्यात आले, पण मागील दोन वर्षांत ट्रस्टचे तब्बल चौदा कोटी रुपये अन्य कंपनीकडे वळवण्यात आले, ही बाब अधिकच संशयास्पद आहे. १९६० पासून या परिसरात असलेले भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आज धोक्यात आले आहे. मंदिराला तातडीने पोलीस सुरक्षा देण्यात यावी, अशी सर्वांची मागणी आहे”.
सुप्रिया सुळे म्हणाल्या ,सदर वसतिगृह विक्रीच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्यांच्या शिक्षणाचे नुकसान करण्यात आले, हे अत्यंत वेदनादायी आहे. या निर्णयात सहभागी असलेल्या सर्वांचीतातडीने चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजातून होत आहे.
याशिवाय बिरेश्वर क्रेडिट सोसायटीने ५० कोटी आणि बुलडाणा अर्बनने २० कोटी रुपये विकासकाला कर्ज देताना बोर्डिंगमधील भगवान महावीर मंदिर गहाण ठेवले, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. कोणत्याही शहानिशा न करता असे कर्ज कोणाच्या दबावाखाली दिले गेले, याची तात्काळ चौकशी करून संबंधित संस्थांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे”.
“१७ ऑक्टोबर रोजी हजारो जैन बांधव आणि गुरु महाराजांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनातील असंतोषाची दखल सरकार घेणार आहे का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. या संपूर्ण खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नेमकं कोणाचं हित साधले जाणार आहे, हे सरकारने पारदर्शकपणे स्पष्ट करावे.
त्या पुढे म्हणाल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की, आपण कृपया या विषयामध्ये वैयक्तिक लक्ष घालून सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट विषयक प्रकरणावर माननीय धर्मदाय आयुक्त, मुंबई यांना तातडीने सुनावणी घ्यायला सांगावी. तसेच व्यवहारावर त्वरित स्थगिती द्यावी, हीच सर्व जैन बांधवांची एकमुखी मागणी आहे. तसेच SHND जैन बोर्डिंगमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात यावा, हीच खरी श्रद्धांजली त्या ट्रस्टच्या संस्थापकांना ठरेल”, सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.