Team My Pune City – शहरातील वाढत्या बेकायदेशीर पाणी जोडण्यांवर (PMC)आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) जलपुरवठा विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. व्यावसायिक तसेच घरगुती पातळीवर घेतलेल्या अनधिकृत पाणी जोडण्यांवर ही कारवाई होत असून, अनेक ठिकाणी जोडण्या तोडून टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस देण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या सूचनांनंतर अधिक गती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी “अतिरिक्त पाणी वापरावर नियंत्रण ठेवावे आणि गळती तपासल्यानंतरच नदीत पाणी सोडावे,” अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १ ऑगस्टपासून पीएमसीने शहरात पाणीमीटर बसविण्याचे काम सुरू केले असून, गळती शोधण्याला आणि दुरुस्तीस प्राधान्य देण्यात आले आहे.
“ही कारवाई गणेशोत्सवाच्या काळात सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला काही भागांमध्ये तपासणी केली गेली, मात्र आता चतु:शृंगी, स्वारगेट, आणि लष्कर विभागांसह सर्व केंद्रांमध्ये ती अधिक गतीने सुरू आहे,” अशी माहिती जलपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, गॅरेज, बांधकाम साइट्स तसेच खानावळींमध्ये बेकायदेशीर नळजोडण्या आढळून आल्या असून त्या तोडण्यात येत आहेत.
Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असावी अशी आमची अपेक्षा -अजित पवार
Somatane Phata : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक
पूर्वी स्थानिक पातळीवर राजकीय हस्तक्षेपामुळे अशा अनधिकृत पाणी जोडण्यांना खतपाणी मिळाले होते. मात्र आता मंत्रीस्तरावरील आदेश आणि आयुक्तांच्या कठोर भूमिकेमुळे या प्रकारांवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन यशस्वी ठरत आहे. या कारवाईमुळे अनधिकृत पाणी वापरणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, सध्या शहरात एकूण ३ लाख १८ हजार अधिकृत पाणी जोडण्या आहेत. यापैकी आतापर्यंत १,४८१ बेकायदेशीर जोडण्या तोडण्यात आल्या, तर १६६ जोडण्या नियमांनुसार अधिकृत करण्यात आल्या आहेत.
“नव्या बेकायदेशीर जोडण्यांवर कारवाई सुरू असून, काही नळ जोडण्या नियमांनुसार नियमित केल्या जात आहेत. जलपुरवठा विभागाचे उद्दिष्ट गळती कमी करून शिस्तबद्ध पाणीवापर सुनिश्चित करणे हेच आहे,” असे जोशी यांनी सांगितले.