तीन पिढीतील कलाकारांचे बहारदार सादरीकरण
ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
Team My Pune City –किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित कैवल्यकुमार गुरव, (Pune)ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या गायकीची परंपरा यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या मुकुल कुलकर्णी यांच्यासह युवा पिढीतील आश्र्वासक शास्त्रीय गायक अभेद अभिषेकी यांच्या सुरेल स्वराविष्कारात रसिकांनी ‘त्रिधारा’ मैफलीचा आनंद लुटला.
निमित्त होते ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् आयोजित ‘त्रिधारा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् कोथरूड येथे या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
Gahunje: गहुंजे येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
ख्यातनाम गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नातू व प्रसिद्ध गायक पंडित शौनक अभिषेकी यांचे पुत्र अभेद अभिषेकी यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग पुरिया धनश्रीतील ‘बल बल जाऊ मीत मोरे’ या बंदिशीने केली. त्याला जोडून ‘पायलिया झनकार मोरी’ ही सुप्रसिद्ध बंदिश प्रभावीपणे सादर केली. उत्तम फिरत असलेला सुमधुर आवाज आणि बहारदार सादरीकरणाने अभेदने रसिकांची मने जिंकली. कौस्तुभ स्वैन (तबला), माधव लिमये (संवादिनी), चिन्मय कुलकर्णी, ऋचा कुलकर्णी (तानपुरा) यांनी सुरेल साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या मध्यधारेत ग्वाल्हेर आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक मुकुल कुलकर्णी यांनी आपल्या नजाकतपूर्ण सुरांनी रसिकांना मोहित केले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग श्यामकल्याण मधील तिलवाडातील ‘जियो मोरे लाल’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्यानंतर मुकुल कुलकर्णी यांनी ‘ऐसो तुम्हीको मै’ ही शामकल्याणधील बंदिश आणि ‘आन बान जिया मे लागे’ हा पारंपरिक दादरा सादर केला. अलवार सुरांची पक्की बैठक त्यांच्या गायनातून प्रकर्षाने जाणवली. वेदांग क्षीरसागर (तबला), आशिष कुलकर्णी (संवादिनी), कुणाल भिडे, कन्हैया बाहेती (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.
कार्यक्रमाची सांगता किराणा घराण्याचे विख्यात गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या मैफलीने झाली. त्यांनी सुरुवातीस राग मारुबिहागमधील ‘अब मे हू न जानू’ ही बंदिश सादर केली. त्याला जोडून ‘तरपत रैना दिन’ ही बंदिश प्रवाभीपणे सादर केली. त्यानंतर ‘छेडो ना मोहे’ ही रचना ऐकविली. रसिकांच्या आग्रहास्तव पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी ‘मै तोरी ना मानुंगी बतिया’ ही बंदिश तर राग दुर्गा सादर करताना ‘तू रस कान्हा रे’ आणि ‘अजहू न आयिल पिया मोरा रे’ या बंदिशी सुमधुरपणे सादर केल्या. आपल्या मैफलीची सांगता भैरवीतील ‘अकेली जी न जय्यो राधा जमुना के तीर’ या पारंपरिक बंदिशीने केली. बहारदार आवाज, सुरांवरील पकड, तीन सप्तकात सहज फिरत असणारा आवाज असलेल्या या अद्भुत सादरीकरणाने रसिक मोहित झाले.

प्रणव गुरव (तबला), स्वरूप दिवाण (संवादिनी), आदित्य जोशी, वैष्णवी बरकते, सचिन जाधव (तानपुरा, सहगायन) यांनी सुमधुर साथसंगत केली.
कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशनच्या संचालिका चेतना कडले, सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी, प्रसिद्ध गायिका सुमन नागरकट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरविंद देशपांडे यांनी केले.