Team My Pune City –दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गावी जाण्याची लगबग सुरू(RTO News) झाली असताना खासगी प्रवासी बस चालकांकडून होणाऱ्या मनमानी भाडेवाढीवर आता आळा बसणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने यासाठी विशेष भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला असून, प्रवाशांकडून जादा दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कठोर कारवाई होणार आहे.
राज्य शासनाच्या २०१८ च्या निर्णयानुसार खासगी बस चालकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दरपत्रकापेक्षा दीडपटीपेक्षा अधिक भाडे आकारण्यास मनाई आहे. मात्र, दरवर्षी दिवाळीच्या काळात मागणी वाढल्यामुळे काही ट्रॅव्हल्स चालक दुप्पट ते तिप्पट दराने प्रवाशांची लूट करतात. या पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनाने यंदा विशेष मोहीम हाती घेतली आहे.
Lonikand Crime News : लोणीकंद येथे युवकाकडून २२ लाखांहून अधिक किमतीचा अफू जप्त
Gahunje: गहुंजे येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सांगितले की, “दिवाळी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्स बसची तपासणी करण्यासाठी विशेष पथके नेमली जाणार आहेत. मोटार वाहन निरीक्षकांच्या माध्यमातून रस्त्यावरच तपासणी केली जाईल. कोणीही चालक जादा पैसे घेत असल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.”
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी प्रवाशांना आवाहन केले की, “खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारले गेल्यास नागरिकांनी तत्काळ ‘आरटीओ’कडे लेखी अथवा ऑनलाइन तक्रार करावी.”
तक्रार कशी कराल?
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांना dyrto.14-mh@gov.in या ई-मेल आयडीवर ऑनलाइन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कार्यालयात थेट लेखी तक्रार दाखल करता येईल.
दरवर्षी प्रवाशांची लूट होत असून, कारवाई केवळ काही मोजक्या बसपुरतीच मर्यादित राहते, अशी नाराजी काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे. प्रवासी प्रणव भोसले यांनी सांगितले, “दरवर्षी दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स बसचालक मनमानी भाडेवाढ करतात. आरटीओ प्रशासनाला ही बाब माहिती असूनही ठोस कारवाई होत नाही. यंदा मात्र आरटीओने ठोस पाऊल उचलून या लुटीवर लगाम घालावा.”
दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आरटीओकडून करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.