कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे कोजागिरीनिमित्त विशेष कार्यक्रम
Team My Pune City –मने उजळून टाकणाऱ्या, जगण्याशी, आठवणींशी जोडल्या (Pune)गेलेल्या गीतांची सुरेल सफर रसिकांना अनुभवायला मिळाली.
निमित्त होते, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे कोजागिरीनिमित्त आयोजित ‘आवाज चांदण्याचे’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. कवी कुसुमाग्रज, सुप्रसिद्ध कवयत्री शांता शेळके, गझलकार सुरेश भट आदींनी चंद्र आणि चांदण्यांवर रचलेली गीते तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या विविध गीतांचा नजराणा रसिकांनी अनुभवला. पुण्याई सभागृह, पौड रोड येथे गुरुवारी (दि. 9) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Prashant Bhagwat: प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने जांभूळ येथे महिलांसाठी खास पर्व – “मनोरंजन संध्या २०२५” उत्साहात !
Pune: ई-नातेसंबंधांचे मानवी ऋणानुबंधात रुपांतर करणे टाळा – डॉ. विजय भटकर
सुरुवातीस राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर, उपाध्यक्ष गिरीश शेवडे, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकात मुक्ता चांदोरकर यांनी कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या कार्याची माहिती देऊन सामाजिक बांधिलकीच्या जपणुकीतून शिक्षण आणि आरोग्यविषयक राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी अवगत केले.
‘चांदण्यात फिरताना’, ‘ही वाट दूर जाते’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘नवीन आज चंद्रमा’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘बुगडी माझी सांडली ग’, ‘शुक्रतारा मंद वारा’ आदी मराठी लोकप्रिय गीतांसह ‘पियो तोसे नैना लागे रे’, ‘मैने तेरे लिए ही सात रंग के’, ‘मधुबन मे राधिका’ आदी सुप्रसिद्ध हिंदी गीते श्रुती देवस्थळी व संजीव मेहेंदळे यांनी सादर करून रसिकांना जादुई सुरांची सफर घडविली. रसिकांनीही अनेक गाण्यांना वन्स मोअरची मागणी करत टाळ्यांच्या गजरात तसेच गायकांच्या सुरात सूर मिसळत साथ केली. कलाकारांना प्रसन्न बाम (संवादिनी), अमित कुंटे (तबला), अभय इंगळे (ऑक्टापॅड) यांनी समर्पक साथसंगत केली तर या श्रुतीमधुर गीतांचे शब्दसमृद्ध निवेदन स्नेहल दामले यांनी केले.
संस्थेच्या विश्वस्त डॉ. राजश्री महाजनी यांनी ‘रे हिंद बांधवा थांब या स्थळी’ हे राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील गौरवगीत सादर केले. आभार गणेश गुर्जर यांनी मानले. कलाकारांचा सत्कार मुक्ता चांदोरकर, हरीभाऊ मुणगेकर, गणेश गुर्जर, विकास उमराणीकर, गिरीश शेवडे, निर्भय हर्डिकर यांनी केला.
पूरग्रस्तांसाठी सव्वा तीन लाखांची मदत जाहीर..
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने ग्रस्त बांधवांना कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे आणि सभासदांतर्फे सव्वा तीन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार असल्याची घोषणा कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर यांनी केली. ही मदत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.