Team My Pune City –राज्यातील कन्याशाळांचे अर्थात मुलींच्या शाळांचे रूपांतर (School Education Department) सहशिक्षणाच्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयानुसार, ज्या ठिकाणी मुलां- मुलींची वेगवेगळी शाळा आहे, त्या शाळांचे लवकरच एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने या बाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच माध्यमिक शाळांचा विकास आणि विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे मूलभूत साधन आहे. त्यामुळे राज्यात स्त्री शिक्षणाला महत्त्व देण्यात आले. माध्यमिक स्तरावरील शिक्षणाचा प्रसार मुलींमध्ये होण्यासाठी सुरुवातीला मुलींसाठी स्वतंत्र कन्याशाळा स्थापन करण्यात आल्या होत्या.तेव्हापासून राज्यात कन्याशाळा अस्तित्वात आल्या.माध्यमिक शिक्षणाची सार्वत्रिक सोय उपलब्ध नव्हती त्यामुळे कन्या शाळांचा मुलींच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी निश्चितच उपयोग होता.
Hinjewadi: हिंजवडी पांडवनगर येथे मिक्सर ट्रकखाली येऊन महिला ठार; बंदी असताना वाहन चालविणाऱ्या चालकावर खुनाचा गुन्हा
२००१ साला नंतर कायम विनाअनुदान तत्त्वावर माध्यमिक शिक्षणाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे मूलभूत साधन असून लिंगभेद नष्ट करून समानतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सहशिक्षण आवश्यक आहे. सहशिक्षणामुळे परस्पर आदर, संवाद कौशल्ये आणि सामाजिक जाणीव वाढीस लागते, तसेच विद्यार्थी वास्तव जगातील विविधतेसाठी अधिक तयार होतात.असे शिक्षण विभागाने नमूद केले.
उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने याचिका क्रमांक ३७७३/२००० च्या निकालात यापुढे कन्या शाळांना स्वतंत्रपणे परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश दिले आहेत. या निर्णय नुसार कन्या शाळांचे सहशिक्षण शाळेत रूपांतरण करण्यासाठी २००३ आणि २००८ मधील शासन निर्णय अधिक्रमित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला.
एकाच परिसरात मुला मुलींच्या स्वतंत्र शाळा असल्यास त्यांचे एकत्रीकरण करावे. वेगवेगळ्या शाळांचे रूपांतरण सहशिक्षणाच्या शाळेत करावे. या नियमाच्या अंमलबजावणीचे अधिकार शिक्षण आयुक्तांना देण्यात येत आहेत.स्वतंत्र शाळांनी संयुक्त शाळेला मान्यता देण्याचे प्रस्ताव सादर केल्यास त्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकारही शिक्षण आयुक्तांना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.