Team My Pune City –पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली करण्यात आली असून, त्यांना नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रशासनात अनुभवी आणि काटेकोर अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून, कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आणि प्रशासकीय उपक्रमाचे नियोजन हे एक मोठं आव्हान मानलं जातं.
पिंपरी-चिंचवडमधील कार्यकाळ
शेखर सिंह यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्याच काळात महापालिकेवर निवडून आलेलं प्रशासन बरखास्त झाल्याने त्यांनी प्रशासक म्हणूनही जबाबदारी स्वीकारली.
गेल्या तीन वर्षांत त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा, स्मार्ट सिटी, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक सुधारणा यावर काम केलं. ‘स्वच्छ सर्वेक्षण’, ‘ई-गव्हर्नन्स’ आणि ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमांबद्दल महापालिकेला राज्य आणि केंद्र पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले.
महत्वाचे निर्णय आणि उपक्रम
त्यांच्या कार्यकाळात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, ग्रीन बॉण्ड्स, स्मार्ट स्कूल्स, डिजिटल प्रॉपर्टी टॅक्स, जुना वसाहतींचा पुनर्विकास, आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रकल्प यावर भर देण्यात आला.महामेट्रोशी समन्वय साधून रस्ते सुधारणा, पार्किंग झोन आणि वाहतुकीचे नियोजन यामध्येही त्यांनी पुढाकार घेतला.
वादग्रस्त निर्णय आणि राजकीय आरोप
त्यांच्या कार्यकाळात अनेक वादही गाजले.महापालिकेतील काही ठेके, मनुष्यबळ भरती आणि बांधकाम परवानग्या प्रक्रियेबाबत भ्रष्टाचाराचे आरोप झाले. विरोधी पक्षांकडून त्यांच्या बदलीची मागणी वारंवार करण्यात येत होती.शेखर सिंह हे भाजपधार्जिणेअसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला होता.विशेष म्हणजे, गेले दोन महिने त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती, परंतु निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने निर्णय लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात होतं. अखेर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच त्यांची बदली करण्यात आली आहे.
नवीन आयुक्तपदाची सूत्रे
शेखर सिंह यांच्या बदलीनंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. हर्डीकर हे यापूर्वी पुणे महापालिका, नगरविकास विभाग आणि महामेट्रोमध्ये वरिष्ठ पदांवर कार्यरत राहिलेले अनुभवी अधिकारी आहेत.
महापालिकेच्या आगामी निवडणूक प्रक्रियेत आणि विकासकामांच्या गतीत त्यांच्या नेमणुकीनंतर कोणते बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय आणि प्रशासकीय संदर्भ
शेखर सिंह यांच्या बदलीकडे राजकीय पार्श्वभूमीवरूनही पाहिले जात आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बदली होत असल्याने, यामागे राजकीय सूचकता असल्याचं काहींचं मत आहे.भाजप शासित काळात सिंह यांनी अनेक प्रकल्पांना गती दिली, मात्र काही ठिकाणी स्थानिक नागरिक आणि संघटनांशी वादही निर्माण झाले.शेखर सिंह यांनी प्रशासकीय कारकिर्दीत अनेक पुरस्कारांची नोंद आपल्या नावावर केली असली, तरी त्यांच्या कार्यकाळावर टीकेची छाया कायम राहिली.
आता नाशिक कुंभमेळा २०२७ या राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या खांद्यावर येत आहे. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदावर श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती ही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.