‘पार्थसूत्र’ आणि ‘बो ॲण्ड बियाँड’ पुस्तकांचे प्रकाशन
Team My Pune City – आपल्या संस्कृतिक संचिताचा अविभाज्य आणि अनमोल ठेवा(Pune) असलेल्या रामायण आणि महाभारताच्या प्रवाभाखाली जगाच्या पाठीवरील खूप मोठी लोकसंख्या आहे. सध्याच्या काळातील संघर्षाची परिस्थिती बघता जगातील सगळ्या घटनांकडे सांस्कृतिकदृष्टीकोनातून बघण्यासाठी सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा माजी खासदार विनय सहस्रबुद्ध यांनी व्यक्त केली.
दिलीपराज प्रकाशन प्रकाशित, वैभव केळकर व डॉ. मेघना दलाल लिखित पार्थसूत्र आणि बो ॲण्ड बियाँड या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी विनय सहस्रबुद्धे बोलत होते. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे, प्रकाशक मधुर बर्वे उपस्थित होते.
Lonavala News : लोणावळा व तळेगाव नगराध्यक्षपदाच्या आरक्षण पदाची आज होणार सोडत ; इच्छुक उमेदवारांत उत्सुकतेचा शिखरबिंदू
Eknath Shinde : समाजस्नेह पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर
महाभारतातील अर्जुन ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून ‘पार्थसूत्र’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखनाची प्रभावीपणे केलेली मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल, असे नमूद करून विनय सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, ललित पद्धतीने पुस्तकाचे लिखाण करण्यात आले असल्याने वेगळेपणा जाणवतो.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, रामायण-महाभारत हे आपल्या संस्कृतीचा ठेवा आहेत. आपल्या आयुष्यात अर्जुनावस्था येते तेव्हा मनातील वैचारिक धागे कृष्ण बनून मार्गदर्शन करीत असतात. अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या नात्यात खूप वेगळेपण आहे. अर्जुनाने प्रश्न विचारले पण श्रीकृष्णाने उत्तर देणे सोडले नाही. संवाद न तुटणे हे दोघांच्या नात्यातील वैशिष्ट्य आहे.
पुस्तक लेखनाविषयी बोलताना मेघना दलाल म्हणाल्या, अर्जुन आणि त्या भोवतीचे महाभारत असे लिखाणाचे कथासूत्र आहे. आजच्या काळाशी अन्वयार्थ लावत केलेले लिखाण म्हणजे हे पुस्तक होय. नायक म्हणून अर्जुनाची निवड का केली याविषयी वैभव केळकर यांनी मनोगत व्यक्त केले.