Team My Pune City – पुणे शहरातील वाढती ( Yerwada-Katraj Tunnel) वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या येरवडा ते कात्रज बोगदा प्रकल्पावर महापालिकेने विराम दिला आहे. तब्बल 20 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प खर्चिक व व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रकल्प महापालिकेच्या पातळीवर करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
हा मुद्दा नुकत्याच झालेल्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा (पुम्टा) च्या बैठकीत चर्चिला गेला. त्यावेळी आयुक्त राम यांनी आपली भूमिका मांडत ( Yerwada-Katraj Tunnel)सांगितले की, केवळ 20 किलोमीटरच्या बोगद्यासाठी तब्बल 7 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चाच्या तुलनेत या मार्गावरून होणारी वाहनांची वाहतूक खूपच कमी असल्याने प्रकल्पाची उपयुक्तता दिसत नाही.
मुळात या प्रकल्पाचा प्रस्ताव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मांडला होता. कात्रज–येरवडा हा बोगदा उभारण्यासाठी 4 हजार 503 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा ( Yerwada-Katraj Tunnel) अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ‘मोनार्क’ या एजन्सीकडून अहवाल तयार करण्यात आला. या अहवालानुसार सुमारे १८ ते २० किलोमीटर लांबीचे सहा लेनचे दोन बोगदे तयार करावे लागणार होते; मात्र त्यासाठीचा खर्च परवडणारा नसल्याचे निष्पन्न झाले.
Rotary City : समाज परिवर्तनात महिलांचे योगदान महत्वाचे – सारिका शेळके
आयुक्त राम म्हणाले, “येरवडा ते कात्रज बोगदा तयार करण्याचा प्रकल्प व्यवहार्य नाही. पुम्टा बैठकीत महापालिकेची ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.”
यामुळे शहराच्या उत्तर ते दक्षिण भाग जोडणाऱ्या या महत्वाकांक्षी बोगद्याच्या संकल्पनेला आता महापालिकेच्या पातळीवर विराम ( Yerwada-Katraj Tunnel) मिळाला असून, या दिशेने पुढील वाटचाल होण्याची शक्यता कमी झाली आहे.