कोणत्या तरी जिंदादिलांच्या, दर्शना आलो इथे..!
Team My Pune City -‘मृत्यो, अरे येतास जर का, होऊनी साकार तू, सांगितले (Pune)असते तुलाही, कोण मी अन् कोण तू’, ‘गेलो जरा स्वर्गात, बघण्या काय आहे ते खरे, ऐकिले जे काय आम्ही, सारेच नव्हते ते खरे’, ‘मृत्युची माझ्या वदंता, सर्वत्र जेव्हा पसरली, घबराट इतुकी नर्कलोकी, केव्हाच नव्हती पसरली’, ‘हसतील ना कुसुमे जरी, ना जरी म्हणतील ‘ये’, पाऊल ना टाकू तिथे, बाग ती आमुची नव्हे’, ‘शायरी नुसतीच नाही, गावया आलो इथे, कोणत्या तरी जिंदादिलांच्या, दर्शना आलो इथे’. अशा जन्म-मृत्यू, अध्यात्म, श्रृंगार, विनोद, प्रणय आणि दार्शनिकता दर्शविणाऱ्या, कल्पना विलासात भरारी मारणाऱ्या मराठीतील शेरोशायरीची मैफल आज रंगली.
निमित्त होते जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या मराठी शेरोशायरीवर आधारित ॲड. प्रमोद आडकर यांच्या एकपात्री प्रयोगाचे. पत्रकार भवन येथे आम्ही एकपात्री महाराष्ट्रतर्फे रविवारी (दि. 21) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 15 वर्षांनंतर या कार्यक्रमाचा पुन्हा आरंभ करत आहे आणि ही जिंदादिलीची सफर अशीच सुरू ठेवण्याचा मानस आहे, असे ॲड. प्रमोद आडकर यांनी सुरुवातीस नमूद केले. आज आयोजित केलेला ११वा प्रयोग होता.
Talegaon Dabhade: शिक्षक हे पिढी घडवण्याचे काम करतात-चंद्रकांत शेटे

PM Narendra Modi: पंतप्रधान आज पाच वाजता देशवासियांशी संवाद साधणार
भाऊसाहेब पाटणकर यांच्या मराठीतील शेरोशायरीचे वैशिष्ट्य सांगून ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात ‘उन्मेश ज्यांच्या यौवनाचा, काहीच ना झाला कमी’ या शायरीने केली. मराठी बाण्याचा प्रियकर दर्शविताना भाऊसाहेब पाटणकर यांनी लिहिलेल्या ‘भ्रमरापरी सौंयर्द वेडे, आहो जरी ऐसे आम्ही, इश्कातही नाही कुठेही, भिक्षुकी केली आम्ही’ ही शायरी ऐकविली. मजनूलाही सल्ला देताना भाऊसाहेब म्हणतात, ‘मजनू अरे, थोडा आम्हा का भेटला असतास तू, एकही आसू खरोखर, गाळला नसतास तू’ ही शायरी सादर करून ॲड. आडकर यांनी रसिकांची दाद मिळविली.
आपल्या शायरीच्या निर्मितीबद्दल रचलेल्या ‘आसवे नयनात जर या, निर्मिली नसती कुणी, नावही या शायरीचे, ऐकीले नसते कुणी’ या पाटणकर यांच्या ओळी ॲड. आडकर यांनी प्रभावीपणे सादर केल्या.
जीवन आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील काळ दर्शविताना जीवनातले कठोर वास्तव म्हणजेच वार्धक्य. या विषयी भाऊसाहेब पाटणकर यांनी भाष्य करताना आपल्या मिश्किलपणा सोडलेला दिसत नाही. हे भावस्पर्शी दर्शन अडॅ. प्रमोद आडकर यांनी ‘रिझविण्या आम्ही इथेही, आहेत कोणी सोबती, सोबती आहेत आसू, गतकाल आहे सोबती’ या शायरीतून दर्शविले.
माणसाच्या मृत्यूनंतरचे दाहक सत्य, शायराने स्वर्गात मारलेला फेरफटका आणि भगवंतालाही सुनावलेले बोल यांवर भाष्य करणाऱ्या शायरी देखील रसिकांची दिलखुलास दाद मिळवून गेल्या.
पत्त्याच्या खेळातील एक्का ते राजा आणि जोकर यांच्या दार्शनिकातून मांडलेल्या ‘मारतो राजास एक्का, नहिल्यास दहिला मारतो, कल्पनेचे खेळ सारे, कुणी कुणा न मारतो’ या जीवनाची सत्यता दर्शविणाऱ्या अनोख्या शायरीने कार्यक्रमाची सांगता केली.
आम्ही एकपात्री, महाराष्ट्रच्या अध्यक्षा अनुपमा खरे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली. संस्थापक बंडा जोशी यांनी ॲड. प्रमोद आडकर यांचा सत्कार केला. थोर साहित्यिक आपल्यात नसले तरी अशा कार्यक्रमांमधून त्यांच्या साहित्यकृती समाजापुढे गेल्या पाहिजे या हेतूने कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.