स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने नादब्रह्माच्या उपसकाचा सन्मान
संगीत परंपरा आणि माझ्या कार्याची सांगड घालणारा सन्मान- पंडित रामदास पळसुले
संगीत माझ्यासाठी कला नसून श्वास आणि साधना आहे – पंडित रामदास पळसुले
Team My Pune City -संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा असणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे (Pune)यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार म्हणजे समृद्ध भारतीय संगीत परंपरा आणि माझ्या कार्याची सांगड घालणारा अमूल्य सन्मान आहे. संगीत ही माझ्यासाठी फक्त कला नसून तो माझा श्वास, साधना आहे. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून यापुढेही मी संगीताची साधना अतिशय मनोभावे करून या उच्च परंपरेला न्याय देत हा अनमोल वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा अथक प्रयत्न करत राहीन, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तालवादक पंडित रामदास पळसुले यांनी केले.
गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तालवादक पंडित रामदास पळसुले यांचा शनिवारी (दि. 20) गौरव करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना पंडित पळसुले बोलत होते. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. अजय पोहनकर आणि सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत अच्युत गोडबोले यांच्या हस्ते झाले. तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू, गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, सचिव डॉ. वासंती ब्रह्मे मंचावर होते. 50 हजार रुपये, शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. टिळक स्मारक मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. प्रभा अत्रे या शास्त्रशुद्धता, साधना आणि नवनिर्मितीचा संगम असलेल्या महान कलाकार होत्या, असे गौरवाने नमूद करून पंडित रामदास पळसुले म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे या फक्त गायिकाच नव्हे तर संगीत क्षेत्रातील विद्यापीठ होत्या. त्या संशोधक, लेखिका आणि प्रभावी गुरू देखील होत्या. भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहाचविण्यासाठी त्यांनी अखंडितपणे कार्य केले. त्यांच्या गायनातील ऊर्जा आजही रसिकांना आनंद आणि प्रेरणा देत आहे. माझ्या गुरूंकडून मिळालेल्या संस्कारांशिवाय माझे संगीत अपूर्ण राहिले असते. हा पुरस्कार मी माझे कुटुंबिय, मित्रवर्य, सहकलाकार, श्रोतृवर्ग आणि सुहृदांना समर्पित करीत आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना पंडित अजय पोहनकर म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे आणि माझा 50 वर्षांहून अधिक काळाचा अनुबंध होता. पंडित रामदास पळसुले उत्तम वादन करत असून पुढील पिढी घडवत आहेत. त्यांचे गुरू तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी आपल्या प्रत्येक शिष्यावर पुत्रवत प्रेम करून त्यांना संस्कारित केले आहे. डॉ. प्रभा अत्रे यांच्या आवडत्या मारवा रागातील धून पंडित पोहनकर यांनी रसिकांना ऐकविली.
Sangvi: सांगवी मध्ये रॉयल एनफिल्डचा अपघात; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
Sunil Shelke: मावळातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
अच्युत गोडबोले म्हणाले, मला डॉ. प्रभा अत्रे यांचा सहवास लाभला होता. किरणा घराण्याव्यतिरिक्त त्यांचे शास्त्रीय संगीत क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या नावे तबलावादक व अभ्यासक पंडित रामदास पळसुले यांचा सन्मान होत आहे, ही आनंददायक गोष्ट आहे.
प्रास्ताविकात डॉ. दयानंद घोटकर यांनी गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे दिल्या जात असलेल्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्काराविषयी माहिती सांगितली. सूर-ताल या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने पंडित रामदास पळसुले यांना हा पुरस्कार देण्यात आला असून याचे संगीत क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे.
तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे विश्वस्त शारंग नातू म्हणाले, अभिजात कला, भारतीय संस्कृतीचे जतन आणि सामाजिक कार्य या हेतूने हा सन्मान दरवर्षी दिला जातो. सन्मानाचे यंदाचे 14वे वर्ष असून नादब्रह्माचे उपासक पंडित रामदास पळसुले यांचा सन्मान करून तालवाद्याचाच सन्मान केला जात आहे.
मान्यवरांचे स्वागत डॉ. दयानंद घोटकर, शारंग नातू यांनी केले. मानपत्राचे वाचन डॉ. वासंती ब्रह्मे यांनी केले तर सूत्रसंचालन सविता हर्षे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त विशेष सांगितीक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस युवा संतूरवादक निनाद दैठणकर यांनी पूरिया कल्याण राग ऐकवून रसिकांची मने जिंकली. त्यानंतर स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी चंपाकली रागाने मैफलीची सुरुवात केली. विलंबित एकतालातील ‘मोरा मन लागा’ ही बंदिश ऐकवून द्रुत आडाचौतालातील तराणा सादर केला. त्यानंतर द्रुत तीनतालात ‘अब ना करो गुमान’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. ‘जाओ जाओ मोसे करो ना बरजोरी’ या भैरवीने गायन मैफलीची सांगता केली. कार्यक्रमाची सांगता पंडित रामदास पळसुले यांच्या एकल तबलावादनाने झाली. त्यांनी राग तीनताल सादर केला. रसिकांनी त्यांच्या वादनास भरभरून दाद देत मैफलीचा आनंद घेतला. सुयोग कुंडलकर यांनी संवादिनी साथ केली.