‘पुस्तकाचे एकच गाव आणि सगळीकडे जाहिरात’ ही भूमिका चुकीची : विश्वास पाटील
तालुक्यांच्या ठिकाणी वाचनालये, माय मराठीची भवने उभारावीत : विश्वास पाटील
नियोजित संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचा मसाप, साहित्य महामंडळातर्फे जाहीर सत्कार
Team My Pune City –मराठी माणूस नोकरीनिमित्त परप्रांतात गेल्यानंतर तेथील (Pune)स्थानिक भाषा शिकण्यास प्राधान्य देतो, परंतु मुंबईत राहून अमराठी माणूस मराठी शिकणार नाही असा दुराग्रह बाळगतो, मराठी भाषेला मुबंईमध्ये अनेक वर्षे विरोधच होत आहे हे अयोग्य आहे, अशी टीका सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली. पुस्तकाचे एकच गाव आणि सगळीकडे जाहिरात अशा उपरोधिक स्वरात भाष्य करून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुस्तकाचे गाव, वाचनालये निर्माण व्हावीत, माय मराठीची भवने बांधावीत असे आग्रही मतही त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या संस्थांतर्फे सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा बुधवारी (दि. 16) जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना पाटील बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शाल, हार आणि सातारी कंदी पेढा भरवून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने प्रा. मिलिंद जोशी यांनी पाटील यांचा सत्कार केला.
लेखक हा टीपकागदासारखा असावा लागतो. लेखकाला, कवीला जात नसते तर त्याला धर्म असतो. त्याचा संबंध अश्रूंशी असतो. लेखकाने टीकेची पर्वा न करता स्वत:च्या मनाला वाटेल-पटेल ते लिहावे. पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे लेखकाचे काम आहे, असे नमदू करून विश्वास पाटील पुढे म्हणाले, मराठी वाचक अत्यंत जागरूक आहे. एका केसाएवढी चूकही त्याचा नजरेतून सुटत नाही. धोका पत्करल्याशिवाय आणि घरात बसून लेखन होऊ शकत नाही.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचा आनंद व्यक्त करून विश्वास पाटील म्हणाले, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मी कधीच व्याकुळ नव्हतो. 2009साली मला अध्यक्षपदाची संधी चालून आली होती, मात्र मी ‘माझे वय लिहायचे आहे’ असे सांगून ती नाकारली.
आपण सध्या एका मन्वंतरातून चाललो आहोत. आज आपले देव, आपली भाषा सुरक्षित नाही. त्यावर संकट आलेले आहे. आजची युवा पिढी मोबाईलच्या गर्तेत अडकलेली आहे. अशा युवा पिढीला साहित्याच्या प्रांगणात आणण्याचा प्रयत्न संमेलनाच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. साहित्याशी आणि नोकरीशी मी प्रामाणिक आहे. माझ्यावर झालेले वाङ्मय चौर्याचे आरोप अतिशय दु:खद आहेत. मोघम बोलून चुकीच्या वावड्या उठविणे योग्य नाही. मला मायमराठी वाचकांची साथ लाभलेली असून माझ्या साहित्यकृतींमधील शब्दांची आणि सत्याची धार याला वाचकांनी न्याय दिला आहे. न्यायदेवता माझ्या शब्दांकडे लक्ष ठेवून असल्यामुळे पुढील काळातही मला उत्तम लेखन करावेच लागेल.
अध्यक्षपदावरून बोलताना रावसाहेब कसबे म्हणाले, साहित्य संमेलन हा एक आनंदोत्सव असावा. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून युवा पिढीला तुम्हीही लिहू शकता असा विश्वास देणे आवश्यक आहे. लिहिणे ही कुणा एका जाती-धर्म-लिंगाची मक्तेदारी नाही. साहित्यकृती हा नुसता समाज किंवा निसर्गाशी संवाद नसतो तर तो स्वत:शीच संवाद असतो त्यातून प्रश्न निर्माण होतात आणि ते सोडविण्यासाठी साहित्यकृतींची निर्मिती होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, विश्वास पाटील हे असत्याची पेरणी होणाऱ्या काळातील सत्याची पेरणी करणारे साहित्यिक आहेत. आपल्या साहित्य निर्मितीसाठी त्यांनी देशाचाच नव्हे तर जगाचा नकाशा धुंडाळला आहे. ते अभिजन आणि बहुजनांचेही लेखक आहेत. ते पुढे म्हणाले, राजकारणी नव्हे तर साहित्य संमेलनाध्यक्ष हाच खरा समाजाचा नायक असतो. विश्वास पाटील हे साहित्य संमेलनाचेच नव्हे तर सांस्कृतिक संमेलनाचे देखील अध्यक्ष आहेत.
प्रास्ताविकात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, विश्वास पाटील यांची लेखणी इतिहास आणि वर्तमानालाही स्पर्श करणारी आहे. त्यांच्याकडे अव्वल दर्जाची प्रतिभा आहे. ते उथळ पाण्यात रमणारे नाहीत तर अथांग सागराची ओढ असणारे प्रतिभावान साहित्यिक आहेत.
Pune: मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन
Baba Kamble: ई-बाईक टॅक्सी भाडे निश्चितीवर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांचा संताप; बाबा कांबळे यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे म्हणाले, विश्वास पाटील फक्त शब्दातून कारागिरी करणारे साहित्यिक नसून पुस्तके, कादंबऱ्यांमधील परिसर, पात्रे, माणसे यांच्याशी नाळ जुळलेला लेखक आहेत.