Team My Pune City – पुण्यात पीएमपीएमएल बसमधील (Pune)महिला प्रवाशांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांना चांगलाच ऊत आला आहे. सोमवारी महापालिका भवन परिसरात घडलेल्या प्रकारात एका महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरट्याने कटरने तोडून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीएमपीएमएल वाहकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे हा चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात आला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहकाने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव लखन सुहास जाधव (वय 30, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे आहे. तर त्याचा साथीदार चाँद शेख (रा. मुंढवा) हा पसार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणी प्रवासी महिला रेणू हाडु साहू (वय 53, रा. आनंदनगर, सणसवाडी ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.15) सायंकाळी साहू या पीएमपीएमएल बसने सणसवाडी येथून पुण्याकडे येत होत्या. बस महापालिका भवन येथे थांबताच साहू या खाली उतरत असताना चोरटे जाधव व शेख यांनी मदतीच्या बहाण्याने त्यांची पिशवी पकडली. महिलेला उतरण्यास मदत करत असल्याचा आव आणून चोरट्यांनी पिशवी घट्ट धरली. दरम्यान, कटरच्या सहाय्याने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी तोडण्यात आली.
Maval: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर; मावळ तालुका प्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती
Pune: ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ;नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती
बांगडी चोरी झाल्याचे लक्षात येताच साहू यांनी आरडाओरडा केला. त्याचवेळी वाहकाच्या लक्षात प्रकार येताच त्याने तत्काळ चोरट्यांचा पाठलाग केला. शौर्य दाखवत वाहकाने जाधव याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचा साथीदार शेख मात्र पसार होण्यात यशस्वी झाला.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक रोमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पसार आरोपी चाँद शेख याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, पीएमपीएमएल वाहकाच्या धाडसी भूमिकेमुळे अनेक प्रवासी सुरक्षित राहिले. त्यामुळे सर्वच बस प्रवाशांनी जागरूक राहून चोरी रोखण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.