Team My Pune City – चाकण एमआयडीसीसह परिसरातील नागरी समस्या (Chakan)आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
चाकण नगरपरिषद, एनएचएआयकडून पोलीस बंदोबस्तात चाकण पालिका हद्दीत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. १५० अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी प्रशासकीय यंत्रणे कडून सांगण्यात आले आहे.
चाकण मध्ये बुधवारी (दि. १०) आंबेठाण चौक भागात आणि गुरुवारी ( दि. ११ ) त्या पुढील भागात कारवाई करण्यात आली. मागील आठवड्यात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण एमआयडीसीसह शहर परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते.
MHADA : पुणे-पिंपरी चिंचवड शहरात MHADAची ६,१६८ घरांची लॉटरी; अर्जाची संधी ३१ ऑक्टोबरपर्यंत
Bapusaheb Bhonde Highschool : ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा
त्यानुसार संबंधित कारवाई पुणे-नाशिक महामार्गावर चाकण- तळेगाव चौक, आंबेठाण चौक ते एकतानगर रस्त्याच्या एका बाजूने करण्यात आली असून सुमारे १५०
अतिक्रमणे काढण्यात आली. या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी, अशा आशयाच्या नोटीसा पूर्वीच बजावण्यात आल्या होत्या. मात्र याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे.
या कारवाईमुळे संबंधित भागातील रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार असून पुणे- नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेबावीस मीटरच्या आतील अतिक्रमणे काढण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कारवाई प्रसंगी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सह. कार्यकारी अभियंता दिलीप शिंदे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे रवींद्र रांजणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकातील कर्मचारी यांच्याकडून जेसीबी यंत्राच्या मदतीने सदरची कारवाई केली जात आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या पहाटेच्या दौर्यानंतर कारवाया :
चाकण औद्योगिक क्षेत्रासह (एमआयडीसी) परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या महिन्यात पहाटे चाकणचा दौरा केला होता. यानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण चाकण नगरपरिषद हद्दीत कारवाया करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.