Team My Pune City – आगामी महापालिका (Pune)निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिक, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आदींकडून तब्बल 5 हजार 843 हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतींवर येत्या सोमवारपासून (8 सप्टेंबर) बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात सुनावणी सुरू होणार आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुनावणीसाठी सनदी अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पाडली जाईल.
महापालिका निवडणुकीसाठी यंदा 165 सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय करण्यात आला आहे. नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमुळे या वर्षी नव्याने प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 22 ऑगस्ट रोजी ही रचना जाहीर करून हरकती मागविण्यात आल्या होत्या. ठरलेल्या मुदतीनुसार गुरुवार (4 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता हरकती दाखल करण्याची मुदत संपली.
नोंदविण्यात आलेल्या हरकतींपैकी सर्वाधिक 2 हजार 66 हरकती प्रभाग क्रमांक 34 नन्हे-वडगाव बुद्रुकमधून प्राप्त झाल्या आहेत. विमाननगर-वाघोली (प्रभाग 3) मधून 819 हरकती नोंदविल्या गेल्या असून, या प्रभागात अनुसूचित जातींसाठी आरक्षण न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदले गेले आहेत. मांजरी बुद्रूक – साडेसतरा नळी प्रभागात नदीची नैसर्गिक हद्द ओलांडून जोडलेली थिटे वस्ती वगळावी, या मागणीसाठी शेकडो हरकती आल्या आहेत.
दरम्यान, मध्यवर्ती भागातील शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई (प्रभाग 25), डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी (प्रभाग 29) आणि कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी (प्रभाग 30) मधून एकही हरकत आली नाही. एकमेव पाच सदस्यीय प्रभाग असलेल्या कात्रज – आंबेगाव (प्रभाग 38) मधून 168 हरकती नोंदल्या गेल्या आहेत.
Vadgaon Maval Court : वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजुरी; इमारत बांधणीसाठी १०९ कोटी ८ लक्षांचा निधी
Ganesh Visrajan : गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास करता येणार नाही
विशेष म्हणजे 42 पैकी 9 प्रभागांतून शंभरहून अधिक हरकती आल्या आहेत, तर सहा प्रभागांत केवळ एक आकडी हरकती नोंदल्या गेल्या आहेत. निम्म्याहून अधिक हरकती केवळ पाच प्रभागांतून आल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
बालगंधर्व येथे होणाऱ्या सुनावणीनंतर या हरकतींवर अंतिम निर्णय घेतला जाणार असून, त्यानुसार पुढील प्रभाग रचना निश्चित केली जाईल.