Team My Pune City –चिंचवड येथील न्यू सोनिगरा ज्वेलर्स दुकानात एका व्यक्तीने सोन्याचे कडे विकण्याच्या बहाण्याने चांदीच्या कड्याला सोन्याचा मुलामा देऊन दुकानाच्या मालकाची १ लाख ३० हजारांची फसवणूक केली. ही घटना १२ जुलै रोजी दुपारी घडली. या प्रकरणी २८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल सुभाष बलदोटा (३३, धनकवडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अरविंद पनराज सोनिगरा (५१, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Chakan: .. तर चक्काजाम करून टाका – मनोज जरांगे पाटील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या दुकानात येऊन सोन्याचे कडे विकायचे असल्याचे सांगितले. त्याने चांदीच्या कड्याला सोन्याचा मुलामा देऊन ते सोन्याचे कडे आहे असे भासवून फिर्यादीकडून १ लाख ३० हजार रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक
एका तरुणाने महिलेशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर जातीवरून अपमान करत लग्न करण्यास नकार दिला. ही घटना मार्च २०२५ ते ८ ऑगस्ट २०२५ या दरम्यान घडली. २८ ऑगस्ट रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर सुनील शालिकराम पराळे (२६, मारुंजी, हिंजवडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने “तुझी जात वेगळी आहे” असे म्हणत तिच्याशी लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
मित्राच्या वादात मध्यस्थी करताना हॉटेल व्यवसायिकाला मारहाण
हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून त्याचे दुकान तोडल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) रात्री महाळुंगे एमआयडीसी येथील महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर २ समोर घडली.
याप्रकरणी सुशेन दादाराव गटकळ (३६, निघोजे, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. दत्ता सूर्यवंशी (४५), आदित्य सूर्यवंशी (२१), प्रतीक सूर्यवंशी (२१), एक महिला आणि अल्पवयीन मुलगा या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या अंडा-भुर्जीच्या टपरीवर मित्रांसोबत जेवण करत असताना आरोपी दत्ता याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या आचारीला नेपाळी भाषेत “काल नेपाळी सण होता, तरी तू कामावर का आला होतास? मला माझ्या मालकाने काल सुट्टी दिली होती” असे फिर्यादीला ऐकू जाईल अशा पद्धतीने विचारण्यास सांगितले. फिर्यादीने याबाबत विचारले असता आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्यासोबत झटापट केली. त्यानंतर आरोपीने घरी जाऊन पत्नी आणि मुलांसोबत परत येऊन फिर्यादीला लोखंडी रॉड आणि लोखंडी पट्टीने मारहाण केली. आरोपीच्या पत्नीने हातात लोखंडी रॉड घेतला होता. आरोपीने लोखंडी पट्टी फेकून मारल्याने ती फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या वर कपाळाला लागून त्यांना दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला पकडून लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीच्या दुकानातील खुर्च्या आणि टेबल तोडून नुकसान केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक
बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस आणि दोन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई बुधवारी (२७ ऑगस्ट) रात्री चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळ घडली.
उज्वल विनोद लवे (२३, पिंपरी) याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार जयवंत राऊत यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे ४० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, ५०० रुपये किमतीचे जिवंत काडतूस आणि दोन लोखंडी कोयते असे एकूण ५१ हजार १०० किमतीची शस्त्रे सापडली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे तरुणाला अटक
सांगवी येथे सोशल मीडियावर पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) रोजी जुनी सांगवीतील औंध जिल्हा आयुष रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीजवळ घडली.
ओम उर्फ नन्या विनायक गायकवाड (२१, जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह आशिष वाघमारे (नवी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आकाश खंडागळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओम गायकवाडच्या हातात पिस्तूल असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने तो व्हिडिओ स्वतःचा असल्याचे कबूल केले. व्हिडिओमधील पिस्तूल त्याचा मित्र आशिष वाघमारे याचे असून, पोलिसांनी पकडण्याच्या भीतीने त्याने ते पिस्तूल ओमकडे लपवण्यासाठी दिले होते. पोलिसांनी ओमने लपवून ठेवलेले ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.