Team My Pune City – श्रींच्या आगमनाने पुणेकरांच्या हृदयात भक्तिभावाची लहर(Pune ) उमटली आहे. आज दुपारपर्यंत मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. शहर व उपनगरांमध्ये रात्रीपर्यंत गणरायाच्या मिरवणुकांचा उत्साह कायम होता. ढोल-ताशांचा गजर, नगारावादन, फुलांचा वर्षाव आणि भक्तीगीतांच्या गजरात पुणेकरांनी गणरायाचे स्वागत केले. प्रतिष्ठापनेचा मुहूर्त दुपारी १.५३ पर्यंत असला तरी त्यानंतरही मिरवणुका काढत मोठ्या थाटामाटात श्रींना मंडपात विराजमान करण्यात आले.
कसबा गणपती : पुण्याचे ग्रामदैवत व मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी उत्सव मंडपातून सुरू झाली. संघर्ष, अभेद्य व श्रीराम ढोल-ताशा पथकांच्या गजरात चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक काढण्यात आली. स्वामी सवितानंद यांच्या हस्ते सकाळी ११.४० वाजता गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
Alandi: ढोल ताश्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन

Lonavala: लोणावळ्यात यंदा पावसाचा 200 इंचांचा टप्पा पार
तांबडी जोगेश्वरी : गुलुंजकर यांच्या कार्यशाळेतून उत्सव मूर्ती आणत ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक कुंटे चौक, आप्पा बळवंत चौकमार्गे उत्सव मंडपात पोहोचली. शरद जोशी यांच्या हस्ते दुपारी १२.११ वाजता प्रतिष्ठापना झाली.
गुरुजी तालीम : पुष्परथातून सजलेल्या मिरवणुकीत विविध ढोल-ताशा पथकांचा सहभाग होता. युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी २.३५ वाजता गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
तुळशीबाग गणपती : १२५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या तुळशीबाग मंडळाच्या मिरवणुकीत लोणकर बंधूंचे नगारावादन व वाद्यपथकांचा सहभाग होता. योगी निरंजननाथ यांच्या हस्ते सव्वाबारा वाजता श्रींची प्रतिष्ठापना झाली.
केसरीवाडा गणेशोत्सव : मानाच्या पालखीत विराजमान गणरायाची मिरवणूक रमणबाग चौकातून सुरू झाली. सकाळी ११ वाजता रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते प्रतिष्ठापना पार पडली.
भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट : सकाळी ८.३० पासूनच मिरवणुकीचा जल्लोष सुरू झाला. सात ढोल-ताशा पथकांच्या गजरात प्रेरणादायी वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी सव्वाबारा वाजता प्रतिष्ठापना झाली. विशेष म्हणजे रथाला बैलजोडी न लावता कार्यकर्त्यांनी स्वतः रथ ओढला.
अखिल मंडई मंडळ : फुलांनी सजवलेल्या भव्य मयूर रथातून मिरवणूक निघाली. नवीनचंद्र व स्नेहल मेनकर यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
शहरात मानाच्या गणपतींच्या आगमनाने भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाचा माहोल निर्माण झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात, शंखनाद व नगारावादनासह गणरायाच्या आगमन मिरवणुकींनी पुण्याचे वातावरण मंगलमय केले.