बुधवारी अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन
Team My Pune City – वर्षभर धार्मिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच (Pimpri)सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा कायम राखणाऱ्या पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. बुधवारी (दि.२७) “श्रीं”ची प्रतिष्ठापना करून रात्री ९ वाजता, प्रसिद्ध दिग्दर्शक व सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष विनायक कुलकर्णी व मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त प्रवीण कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
मंडळाची धार्मिक व सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम राखत या वर्षी गणेशोत्सवात ज्येष्ठ नागरिक मंडळाचे भजन, ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, युवती व महिला भगिनींचे मर्दानी खेळ, निबंध, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, धीरज वानखेडे यांच्या भक्ती गीत आणि शिवगीतांचा कार्यक्रम आणि महिला भगिनींचा आवडता “खेळ पैठणीचा” अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष केतन जाचक, खजिनदार समीर कुदळे आणि उपखजिनदार सौरभ कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. सर्व स्पर्धा मोफत असून स्पर्धेतील बक्षीस विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील या जुन्या आणि नामांकित या मंडळाची स्थापना १९७६ साली झाली होती. माजी नगरसेवक नगरसेवक नंदकुमार जाधव, प्रदीप कुदळे, राजेंद्र परदेशी, दिपक उत्तेकर, गजानन गवळी, प्रवीण कुदळे अशा मान्यवरांनी मंडळाचे अध्यक्ष पद भूषवून संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून या वर्षीचा गणेशोत्सव विशेषत्वाने साजरा होणार आहे. गेल्या पाच दशकांपासून सुवर्ण मित्र मंडळाने समाजहिताचे अनेक उपक्रम राबवत गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. धार्मिक व सांस्कृतिक परंपरेबरोबरच सामाजिक प्रबोधन करणे हा मंडळाचा प्रमुख हेतू आहे. सर्व गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग, तरुणाईचा उत्साह आणि महिला भगिनींच्या सहभागाने या वर्षी पंचक्रोशीत आदर्श ठरेल असे उपक्रम यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात राबवून गणेशोत्सव अधिक उपयुक्त व आदर्शवत करण्याचा संकल्प केला आहे, सर्व ग्रामस्थांनी व नागरिकांनी या उपक्रमांना उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन सुवर्ण मित्र मंडळ, शंभू प्रतिष्ठान, पिंपरीगाव यांच्याकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक :- बुधवारी, दि.२७ ऑगस्ट, रात्री नऊ वाजता, “श्रीं” चा आगमन सोहळा आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उदघाटन; गुरुवारी (दि.२८ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता, जेष्ठ नागरिकांचे भजन आणि “श्रीं”ची आरती आठ वाजता; शुक्रवारी (दि. २९ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता, विठ्ठल रुक्मणी भजनी मंडळ ,काळेवाडी यांचे भजन नंतर ८ वाजता “श्रीं”ची आरती; शनिवारी ( दि. ३० ऑगस्ट) दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत जेष्ठ नागरीक कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा, रात्री ८ वाजता “श्रीं”ची आरती; रविवारी (दि.३१ ऑगस्ट) सकाळी ११ ते दुपारी ३, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, सायंकाळी सहा वाजता, सावतामाळी भजन मंडळ, पिंपरीगाव यांचे भजन, ७:३० वाजता युवती व महिला भगिनींचे मर्दानी खेळ त्यानंतर ८ वाजता “श्रीं”ची आरती.
सोमवारी (दि.१ सेप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता, तुळजाभवानी भजनी मंडळ यांचे भजन आणि ८ वाजता “श्रीं”ची आरती; मंगळवारी (दि.२ सप्टेंबर) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी सहा वाजता भजन आणि ८ वाजता “श्रीं”ची आरती होईल.
बुधवारी (दि.३ सप्टेंबर) सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, रात्री आठ वाजता “श्रीं”ची आरती होईल; गुरुवारी (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी सात वाजता धीरज वानखेडे यांच्या भक्ती गीत आणि शिवगीतांचा कार्यक्रम आणि ८ वाजता “श्रीं”ची आरती होईल आणि महिला भगिनींचे विशेष आकर्षण असणारा ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.५ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे त्यानंतर “श्रीं”ची आरती होईल या सर्व कार्यक्रमाला गणेश भक्तांनी, मंडळाचे हितचिंतक, देणगीदार आणि पंचक्रोशीतील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.