Team My Pune City –पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सव शांततेत (Pimpri-Chinchwad)आणि उत्साहात साजरा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने जय्यत तयारी केली आहे. गणेशोत्सव २७ ऑगस्ट २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे. या वर्षी आयुक्तालयाच्या हद्दीत २,१४६ सार्वजनिक गणपती आणि २,६५,२७४ घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन ४५ घाटांवर होणार असून, सातव्या दिवशी ५२१ गणपती, नवव्या दिवशी २३६ गणपती, दहाव्या दिवशी ३७३ गणपती, अकराव्या दिवशी ९५९ गणपतींचे विसर्जन होणार आहे.
नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलिस ठाण्यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. पोलीस उपायुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि परिमंडळीय पोलीस उपायुक्त यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, शांतता समिती, डीजे चालक/मालक आणि सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी मंडळांची आणि १८ ऑगस्ट २०२५ रोजी शांतता समितीची बैठक घेतली.
Alandi:आळंदीत हरितालिका पूजन उत्साहात
Majha Bappa Gharoghari: घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
या बैठकांमध्ये डीजे/डॉल्बी साउंड सिस्टीम आणि लेझर बीम लाइटचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २३ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ नुसार लेझर बीम लाइटच्या वापरास प्रतिबंध करणारे आदेश जारी केले आहेत. सर्व विसर्जन मार्ग आणि स्थळांची पाहणी महानगरपालिका आणि महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली आहे. याद्वारे रस्त्यांवरील खड्डे भरणे, झाडांच्या फांद्या छाटणे, लटकलेल्या तारा व्यवस्थित करणे आणि विद्युत रोषणाईची व्यवस्था करणे यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दंगल नियंत्रण योजनांचा सराव केला असून, ढाल, हेल्मेट, लाठी आणि अश्रुधुराच्या नळकांड्या यांसारखी दंगल नियंत्रण साधने तयार ठेवली आहेत. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली असून, सर्व पोलीस ठाण्यांना नॉईज लेव्हल मीटर देण्यात आले आहेत. मंडळांना उत्सवाची आणि लाउडस्पीकर/वादकांची ऑनलाइन परवानगी देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १८०९ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक व्यवस्था
उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी २ अधिकारी आणि १०० होमगार्ड्सचे अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्यात आले आहे. विसर्जनाच्या दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी सातव्या आणि अकराव्या दिवशी ३८ महत्त्वाच्या मिरवणूक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे.
पोलिसांचा फौजफाटा
उत्सव काळात शांतता राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात १ पोलीस सह आयुक्त, १ अपर पोलीस आयुक्त, ६ पोलीस उपायुक्त, ९ सहायक पोलीस आयुक्त, ६४ पोलीस निरीक्षक, २९१ सपोनि/पोउपनि, २३५५ पोलीस अंमलदार, ४०० होमगार्ड्स, २ एसआरपीएफ प्लाटून, १ बीडीडीएस पथक, १७ स्ट्रायकिंग आणि ६ आरसीपी प्लाटून यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्तांनी सर्व नागरिकांना आणि गणेशोत्सव मंडळांना पोलिसांना सहकार्य करून हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.