Team My Pune City – मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) वरील बोरघाट परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या घाटातून सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांवर तात्काळ बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बोरघाट भागामध्ये जड वाहनांमुळे वारंवार अपघातांच्या घटना घडत होत्या. या अपघातांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत होती, तर कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उपस्थित होत होता. विशेष म्हणजे, बोरघाट हा तीव्र वळणांनी भरलेला व चढउताराचा रस्ता असल्याने मोठ्या वाहनांना तोल सांभाळणे कठीण जाते. परिणामी, वेगावर नियंत्रण सुटून मोठे अपघात घडतात.
Hinjawadi Crime News : हिंजवडीमध्ये नवऱ्याच्या प्रेयसीचे भर दिवसा अपहरण
यासंदर्भात रायगड जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष अभ्यास करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अवजड वाहनांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. या मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तातडीने कारवाई केली असून, अधिसूचनेद्वारे जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला आहे.
हा निर्णय राबविल्यामुळे बोरघाटातून हलक्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू राहील आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, जड वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा विचार करावा लागणार असून, वाहतूक विभागाकडून त्याबाबत स्वतंत्र मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश तात्पुरता असला तरी तो पुढील काळात कायमस्वरूपी स्वरूपात लागू होऊ शकतो, अशी चर्चाही प्रशासन व वाहनचालकांमध्ये सुरू आहे. अपघात रोखणे आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा निर्णय नागरिकांकडून स्वागतार्ह ठरत आहे.