Team My pune city – दारू पित असताना पूर्ववैमनस्यातून( Pimpri Chinchwad Crime News 18 August 2025) एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ऑरा हॉटेल, पूर्णानगर, चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी सूरज रामदास घोडे (२५, घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आशुतोष सुदाम कदम (२८, घरकुल, चिखली, पुणे), राजा युवराज हजारे (२८, घरकुल, चिखली) आणि शैलेश शाम गायकवाड उर्फ बन्या (३०, थेरगाव) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज त्यांच्या मित्रांसोबत ऑरा हॉटेलमध्ये दारू पीत होते. तेव्हा आरोपी तिथे आले. जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी आशुतोष याने सुरज यांना “मी जेलमधून बाहेर आल्यापासून तुला बघतोय, तू जास्त शहाणपणा करतोयस, तुला आता जिवंत सोडत नाही,” असे म्हणून त्यांच्या कानाखाली मारले. त्यानंतर त्याने टेबलवरील ग्लास आणि दारूची बाटली उचलून सुरज यांच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. सुरज यांचे मित्र अविनाश, धीरज आणि गणेश यांनी आरोपी आशुतोष याला पकडले असता, आरोपी राजा याने बाजूच्या टेबलावरील बिअरची बाटली उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी राजा आणि शैलेश यांनी टेबलवरील दारूच्या बाटल्या आणि ग्लास फिर्यादीवर फेकून मारले. “आम्ही इथले भाई आहोत, तुम्ही आम्हाला ओळखत नाही,” असे म्हणून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. चिखली पोलिस तपास करत आहेत.
Pune Crime News : सहकारनगरमध्ये दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र हिसकावले
लोन देण्याच्या नावाखाली फसवणूक
लोन मिळवून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची २ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १० मार्च ते २५ मार्च २०२५ दरम्यान आराध्या लॉन्ड्री, च-होली बुद्रुक येथे घडली.
या प्रकरणात भरत पाडुरंग काळे (३६, धानोरे, ता. खेड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बाळासाहेब हंगारगे (च-होली बुद्रुक, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्याला रोख आणि गुगल पे द्वारे एकूण २ लाख ८१ हजार ५०० रुपये दिले. आरोपीने पैसे परत न करता आणि लोन पास न करता फिर्यादीचा विश्वासघात केला आणि त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच, आरोपीने फिर्यादीला अॅट्रॉसिटीच्या केसमध्ये अडकवण्याची आणि ठार मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करत आहेत.
कंपनीमध्ये कामगारांना मारहाण, कोयत्याने हल्ला ( Pimpri Chinchwad Crime News 18 August 2025)
कंपनीत काम करत असताना किरकोळ कारणावरून कामगारांना मारहाण करून कोयत्याने हल्ला केला. ही घटना शनिवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी महिंद्रा कंपनी, चिंचवड येथे घडली.
या प्रकरणात सोहेल चुन्ना खान (३७, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये सुरज सरोदे (२५, घरकुल, चिखली), प्रतीक उबाळे (२३, घरकुल, चिखली), अंशु रोकडे (२२, घरकुल, चिखली) आणि प्रथमेश (२५, घरकुल, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात. फिर्यादी पेंटिंगचे आणि आरोपी वॉशिंगचे काम करतात. कंपनीतील लाईट जाऊन परत आल्यावर फिर्यादीने कॉम्प्रेसर चालू केला. तेव्हा आरोपी सुरज याने फिर्यादीला कॉम्प्रेसर चालू करण्यास सांगितले, परंतु फिर्यादीने “मी कॉम्प्रेसर चालू केलेला आहे,” असे सांगितले. त्यावर आरोपी सूरजने “तू उलट का बोलतोस” असे म्हणून फिर्यादीला मारहाण केली. त्याने इतर आरोपींना बोलावून घेतले आणि त्यांनी मिळून फिर्यादीला हाताने मारहाण केली. आरोपी प्रथमेशने सोबत आणलेल्या कोयत्याने भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मित्रांना, गाझी शेख आणि चांद शेख यांना हातावर मारून जखमी केले. तसेच, आरोपींनी फिर्यादीला ठार मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 18 August 2025)
एका तरुणाला कोयता बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (१६ ऑगस्ट) रात्री श्रमिकनगर, ओटास्किम, निगडी येथे अशोक गायकवाड यांच्या घरासमोर घडली.
याबाबत गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस कॉन्स्टेबल सोहेल चिखलकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अरमान बंदेनवाज पठाण (१९, ओटास्किम, निगडी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे ३०० रुपये किमतीचा एक धारदार लोखंडी कोयता जवळ बाळगला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अरमान पठाण याला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक ( Pimpri Chinchwad Crime News 18 August 2025)
तडीपार केलेला आरोपी शहरात वावरताना आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (१७ ऑगस्ट) रात्री च-होली येथे घडली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नारायण सूर्यवंशी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी श्रीधर केशव कदम (३०, खंडोबाचीवाडी, धानोरे, ता. खेड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीधर याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. आरोपीने कोणतीही परवानगी न घेता आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केला. तसेच, आरोपीने कोणत्याही परवान्याशिवाय १०० रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता बेकायदेशीरपणे जवळ बाळगला. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 18 August 2025)
एका तरुणाला पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (१७ ऑगस्ट) रात्री राजमाता जिजाऊ कॉलेजच्या मागील मैदानाजवळ, टेल्को रोड, भोसरी येथे करण्यात आली.
याबाबत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल हर्षद कदम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय संजय गुंड (२८, लांडेवाडी, भोसरी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमाता जिजाऊ कॉलेजच्या मागील मैदानाजवळ, टेल्को रोड, भोसरी येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.