सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत
Team My pune city –पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC)स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करीत केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराने देशात सातवा तर राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तसेच ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ ची महापालिकेने तयारी सुरू केली असून त्या अनुषंगाने स्वच्छतेविषयक घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये ३१ जुलै २०२५ पर्यंत सहभागी होता येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेचे मूल्यांकन केले जाते. २०२४-२५ च्या या स्पर्धेमध्ये पाच हजारांहून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात पिंपरी चिंचवड शहराचा देशात सातवा क्रमांक आला.
Karjat News : कडाव प्रवासी बस थांबा अनधिकृत बांधकाम प्रकरण
Sharad Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांची सत्ता येणार
आता स्वच्छता सर्वेक्षण २०२५-२६ च्या स्पर्धेत देशात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगानेच पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ‘स्वच्छ भारत अभियान’ तसेच ‘स्वच्छ सर्वेक्षण’ या राष्ट्रीय उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महापालिकेने आयोजित केलेली घोषवाक्य स्पर्धा ही पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी स्वच्छता, आरोग्य, जबाबदारी, नागरिकांचा सहभाग वाढावा संकल्पनांवर आधारित आकर्षक, प्रभावी व प्रेरणादायी घोषवाक्य तयार करायची आहेत. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे निकष असे असतील
एक व्यक्ती जास्तीतजास्त २ घोषवाक्ये पाठवू शकते.
घोषवाक्ये मराठीत असावीत आणि १० शब्दांच्या आत असावीत.
स्पर्धा पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली आहे.
सर्वोत्कृष्ट घोषवाक्यांची निवड करून त्यांना महापालिकेच्या विविध माध्यमांतून प्रसिद्धी दिली जाईल.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
घोषवाक्य पाठविण्याची अंतिम तारीख: ३१ जुलै २०२५
स्पर्धेमध्ये असे व्हा सहभागी
- सर्वात प्रथम https://forms.gle/4XiCM2jLxL9A1LZGA या संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यानंतर आपल्याला स्क्रिनवर एक अर्ज दिसेल.
- सदर अर्जामध्ये नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक, पत्ता ही माहिती योग्य भरावी.
- अर्जामध्ये घोषवाक्य लिहावे.
- त्यानंतर अर्ज सबमिट करावा.
पिंपरी चिंचवड शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या वतीने स्वच्छता विषयक घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती वाढावी, तसेच स्वच्छताविषयक उपक्रमात जनसहभाग वाढवा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग व्हावे.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी आरोग्य विभागाने स्वच्छतेविषयक घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
- सचिन पवार, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका