Team My pune city – झिरोदा ट्रेडिंग ॲपमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५२ लाख ३८ हजार ९३३ रुपयांची ( Pimpri Chichwad Crime News 25 July 2025)फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घडली. याप्रकरणी गुरुवारी (२४ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रितिका देवी आणि तिच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला जास्त नफ्याचे आमिष दाखवत झिरोदा ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला चांगला परतावा देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ४७ लाख ३८ हजार ९३३ रुपये गुंतवण्यास भाग पाडले आणि त्यांच्या आभासी खात्यावर मोठा फायदा झाल्याचे दर्शवले. जेव्हा फिर्यादीने ही रक्कम परत मागितली, तेव्हा त्यांना जमा रकमेवर ५ लाख रुपये कर भरण्यास भाग पाडले. कर भरल्यानंतरही त्यांची रक्कम परत न करता त्यांचे एकूण ५२ लाख ३८ हजार ९३३ रुपये एवढ्या रक्कमेची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
गाडी हळू चालवण्यास सांगितल्याने बांबूने मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 25 July 2025)
दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्याच्या रागातून दोघांनी एका व्यक्तीला लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (२३ जुलै) सायंकाळी भूकूम येथे घडली.
या बाबत अविनाश संतू जांभूळकर (४६, वारजे माळवाडी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंट्या आणि त्याच्यासोबतचा एक अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जांभुळकर बापूजीबुवा मंदिर, हिंजवडी फेज तीन येथून देवाचे दर्शन घेऊन सायंकाळी घरी जात असताना रस्त्यामध्ये फिर्यादीस एक अनोळखी दुचाकी ओव्हरटेक करून जात होती. जांभुळकर यांनी त्यास “भाऊ, दुचाकी जरा हळू चालव” असे सांगितले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी भूकूम, जोशी वडेवाले येथे त्यांची गाडी अडवली. गाडीतून उतरून दोघांनी जांभुळकर यांच्या सोबत वाद घालून शिवीगाळ केली. आरोपीने लाकडी बांबूने मारहाण करून जांभुळकर यांचे दोन्ही हात आणि डावा पाय फ्रॅक्चर करून गंभीर जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.
कारची रिक्षाला धडक, चालकाचा मृत्यू ( Pimpri Chichwad Crime News 25 July 2025)
कुरुळी गावात एका इनोव्हा कार चालकाने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (२४ जुलै) पहाटे कुरुळी गावाच्या हद्दीत ए आर आय कंपनीजवळ घडला.
दत्तात्रय पांडुरंग मुंगसे (४९) असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या बाबत काळुराम पोपट मुंगसे (४४, रासे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरेश सदानंद ढोले (४२, कुरुळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश याने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार (एमएच १४/जेपी३५३५) भरधाव वेगाने आणि हयगयीने चालवून फिर्यादीचा भाऊ दत्तात्रय मुंगसे यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा रोडच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडकली. या अपघातात दत्तात्रय गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या मृत्यूस व रिक्षाचे नुकसानीस कारणीभूत होऊन वाहनचालक पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
Kalakendra Firing : माझा भाऊ समाजसेवक, ती बंदूक दुसऱ्याची – शंकर मांडेकर
महाळुंगे येथे २६ हजारांचा गुटखा जप्त ( Pimpri Chichwad Crime News 25 July 2025)
महाळुंगे एमआयडीसी परिसरात २६ हजार ३३५ रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करताना एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (२४ जुलै) सायंकाळी चाकण – तळेगाव रोडवर करण्यात आली.
भिकाराम रामअवतार मौर्या (३०, खराबवाडी) याला अटक करण्यात आली आहे. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल राजेश गिरी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भिकाराम मौर्या हा दुचाकीवरून गुटखा घेऊन जात होता. त्याला चाकण-तळेगाव रोडवर अडवून दुचाकीची झडती घेण्यात आली. त्यामध्ये २६ हजार ३३५ रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करत त्याची दुचाकी आणि गुटखा जप्त केला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.