Team My pune city – एका युट्युबरने शेअर मार्केट संदर्भात पोस्ट केलेले व्हिडीओ पाहून चिखली येथील एक व्यावसायिक प्रभावित झाला. युट्युबर वाकड येथील एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये येणार असल्याचे समजताच व्यावसायिक हॉटेल मध्ये जाऊन युट्युबरला (Pimpri Chinchwad Crime News 15 July 2025)भेटला. हॉटेल मध्ये शेअर मार्केटचे खाते सुरु करण्यासाठी रोख रक्कम दिली. त्यानंतर गुंतवणुकीसाठी रक्कम पाठवली. मात्र पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. ही घटना २१ जानेवारी ते ४ जुलै २०२३ या कालावधीत हॉटेल टिपटॉप वाकड येथे घडली.
सौरभ चावला, अजय कुमार आर्या (राजस्थान) अशी गुन्हा दाखल झालेल्या युट्युबरची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकांत चंद्रशेखर हिरेमठ (३८, चिखली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरेमठ यांना शेअर मार्केट आणि ट्रेडिंगची आवड असल्याने ते युट्युबरवर व्हिडीओ पाहत असतात. तिथे आरोपींच्या युट्युब चॅनलवर हिरेमठ यांना उपयुक्त आणि आकर्षक माहिती मिळाली. दरम्यान, युट्युबर सौभर आणि अजय हे वाकड येथील टिपटॉप हॉटेल येथे येणार असल्याचे हिरेमठ यांना समजले. हिरेमठ यांनी हॉटेल मध्ये जाऊन आरोपींची भेट घेतली. तिथे शेअर मार्केटचे खाते सुरु करण्यासाठी त्यांनी आरोपींना ४५ हजार रुपये रोख स्वरूपात दिले.
त्यानंतर हिरेमठ यांचे एक आभासी खाते तयार करण्यात आले. त्यामध्ये दररोज डॉलर मध्ये पैसे जमा होऊ लागले. आरोपींनी सोलापूर येथे एक सेमिनार आयोजित केला. हिरेमठ हे सोलापूर येथे जाऊन आरोपींना भेटले. आरोपींनी हिरेमठ यांच्याकडून आणखी तीन लाख ९८ हजार ५०० रुपये गुंतवणूक स्वरूपात घेतले. त्यानंतर मात्र हिरेमठ यांच्या खात्यात डॉलर जमा झाले नाहीत. आरोपींना संपर्क केला असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. काही कालावधीनंतर आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हिरेमठ यांनी १४ जुलै २०२५ रोजी पोलिसात तक्रार केली आहे.
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक (Pimpri Chinchwad Crime News 15 July 2025)
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (१४ जुलै) रात्री कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ करण्यात आली.
साहिल अशोक रजपूत (२५, मंगळवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समीर रासकर यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून साहिल रजपूत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.
जमीन विक्रीच्या बहाण्याने फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 15 July 2025)
जमीन विक्रीच्या बहाण्याने एका महिलेची १७.८० लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी २०२४ ते १४ जुलै २०२५ या कालावधीत भुकूम येथे घडली.
सुजित तुकाराम गवारे (३७, भुकूम, मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला भुकूम येथील एक जागा विकण्यासाठी ५७.२० लाखांचा व्यवहार केला. जमीन विक्रीसाठी आरोपीने बनावट कागदपत्रे तयार केली. महिलेकडून १७.८० लाख रुपये घेऊन त्यांना संबंधित जमिनीचे खरेदीखत करून न देता त्यांची फसवणूक केली.
कंपनीच्या नावाने गुंतवणूक घेत १.८६ कोटींची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 15 July 2025)
बांधकाम व्यवसाय कंपनी स्थापन करून त्याअंतर्गत गुंतवणूक रक्कम घेत पाच जणांनी मिळून एक कोटी ८६ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना मार्च २०२३ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत मोशी, महाळुंगे, चाकण, चऱ्होली येथे घडली.
याप्रकरणी नरेंद्र धनराज आमले (२९, मोशी) यांनी याप्रकरणी १४ जुलै रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत राधाकृष्ण होन, बाळासाहेब सखाराम चौरे, निलेश अनिलराव काळे, ऋतुराज देविदास कातकडे, शिरीष ढेंबरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ब्रिक्स सोल्युशन नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या संचालनातून होणाऱ्या नफ्यातून प्रत्येकी पाच टक्के नफा मिळेल. तसेच कंपनीच्या बांधकाम प्रकल्पात प्रत्येकाला एक फ्लॅट देखील मिळेल, असे आरोपींनी फिर्यादी नरेंद्र आणि इतर लोकांना सांगितले. त्यापोटी आरोपींनी नरेंद्र आणि इतर लोकांकडून एक कोटी ८६ लाख ८२ हजार ६०० रुपये घेत त्यांना आश्वासन दिलेल्या गोष्टी न देता फसवणूक केली.