Team My Pune City – देशभरातील हजारो लोकांना बनावट लोन अॅपच्या माध्यमातून आर्थिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या एका मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांनी मुंबईहून मुख्य आरोपीला अटक केली आहे.
आरोपीने पीडितांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवून खोट्या लोन अॅपद्वारे पैसे उकळले आणि नंतर न्यूड फोटो पाठवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत लाखो रुपयांची फसवणूक केली होती.अटक केलेल्या आरोपीचे नाव इसाकी राजन थेवर (वय 29, रा. वाशी, जिल्हा ठाणे, मूळ रा. तमिळनाडू) असे आहे. तो ‘Credit Pilot’, ‘Inloancredit’, ‘FastCash’, ‘HandyCash’ अशा अनेक बनावट लोन अॅपच्या माध्यमातून काम करत होता.
Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादीस व्हॉट्सअॅपवर लोन अॅपची लिंक मिळाल्यानंतर त्यांनी ती उघडताच आरोपीने त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांच्या नावाने जबरदस्तीने कर्ज काढून ते फेडण्यासाठी UPI व्यवहाराद्वारे पैसे मागितले. या प्रकरणी फिर्यादीकडून सुरुवातीला 9 हजार रुपये आणि नंतर पुन्हा 15 हजार रुपये मागितले गेले.
फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो त्यांच्या नातेवाइकांना पाठवले. ही बाब गंभीर असून यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान, आरोपी मुंबईत असल्याचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे निष्पन्न झाले. पोलिसांनी छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून 5 लॅपटॉप, 1 मोबाईल, 7 सिमकार्ड, 2 डेबिट कार्ड असा सायबर गुन्ह्यात वापरलेला डिजिटल मुद्देमाल जप्त केला आहे.
Nigdi: जैन संतांचा चातुर्मास प्रवेश, ‘धर्मवृष्टी’ उपक्रमाने शहरात आध्यात्मिक उत्साह
सदर आरोपी सिंगापूरस्थित एका चायनीज व्यक्तीच्या सांगण्यानुसार हे अॅप तयार करत होता. या अॅप्सद्वारे देशभरात 10 हजारहून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरक्षक प्रविण स्वामी, पोउपनि वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
ही महत्त्वाची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त सारंग आव्हाड, गुन्हे विभागाचे उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोपीच्या आणखी सहकाऱ्यांचा शोध सुरू असून या प्रकारात आणखी मोठा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.