Team My Pune City – पुणे – पिंपरी-चिंचवड महानगर प्रदेश परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)ने मे व जून २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत शिस्तबद्ध आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मोठी कारवाई केली आहे. या काळात एकूण २५७८ विनातिकीट प्रवाशांकडून १२ लाख ८९ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांच्या विविध गैरवर्तन प्रकरणांमध्येही ८ लाख ४४ हजार ६८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
विनातिकीट प्रवासावर दंडाची कारवाई
पीएमपीएमएलने स्पष्ट केले आहे की, बसमधून तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रति प्रवासी ५०० रुपयांचा दंड आकारला जातो. मे २०२५ मध्ये ९४२ विनातिकीट प्रवाशांकडून ४ लाख ७१ हजार रुपये, तर जून २०२५ मध्ये १६३६ प्रवाशांकडून ८ लाख १८ हजार रुपये वसूल करण्यात आले. त्यामुळे एकूण दंडरक्कम १२ लाख ८९ हजार रुपयांवर पोहोचली आहे.
कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनावरही नजर
फक्त प्रवाशांवरच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगाविरोधातही पीएमपीएमएलने कठोर भूमिका घेतली आहे. तिकीट तपासणी विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे चालक-वाहकांच्या २१ प्रकरणांमध्ये थेट कारवाई करण्यात आली.
मे महिन्यात ८ प्रकरणांत ७६८ रिपोर्टच्या आधारे ३ लाख ७७ हजार ४२८ रुपयांचा दंड
जून महिन्यात १३ प्रकरणांत ६८५ रिपोर्टच्या आधारे ४ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा दंड
असा एकूण ८ लाख ४४ हजार ६८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पीएमपीएमएलने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी प्रवासादरम्यान तिकीट घेतल्याशिवाय प्रवास करू नये. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आदर राखून चालक व वाहक यांना आवश्यक ते सहकार्य करावे. नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती न ठेवता कारवाई केली जाणार असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले ( PMPML) आहे.