मध्यम कुटुंबात झालेला जन्म आणि मुलगी झाल्यानंतर हिरा सोडून दगड हातात आला ही वडिलांची पहिली प्रतिक्रिया यांबद्दल सांगताना प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या, “वडिलांना हुंडा द्यावा लागला असता म्हणून मुलगी नको होती पण माझा जन्म झाला. नाळ पुरताना त्या ठिकाणी वडिलांना चांदीच्या नाण्यांचा घडा हाती लागल्याने ते खुश झाले. यानिमित्ताने घरात संपत्ती आली म्हणून माझे नाव शांती ठेवले. पुढे मोठ्या बहिणीला बाळंतपणात झालेला त्रास पाहिला आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला. जैन धर्मात एकतर लग्न करून नवऱ्याच्या घरी जा अथवा साध्वी व्हा हेच दोन पर्याय असल्याने मी साध्वी झाले. मात्र तिथे असताना मी स्वत:शीच प्रतारणा करत असल्याचे अनेकदा वाटायचे. शेवटी निर्णय घेतला आणि आश्रमातून बाहेर पडले. पुढे शाहू मोडक यांच्याशी लग्न झाले आणि साध्वी ते पत्नी असा प्रवास अनुभविता आला.”
शाहू मोडक मला कायम त्यांची शक्ती मानायचे, त्यांचे माझ्यावर प्रेम होतेच मात्र ते मला समान दर्जा, मान आणि सन्मान द्यायचे. ते खऱ्या अर्थाने देव माणूस होते. हे मला कायम कोणत्यातरी पुरस्काराहून अधिक मौल्यवान वाटत आले आहे, असे मोडक यांनी आवर्जून सांगितले. मी गेल्यानंतर मुंबई ऐवजी तू पुण्यात रहा. या शहरात तुला आपुलकी, जीवाभावाची माणसे, सामाजिक स्थर्य आणि समाधान मिळेल असा शाहू मोडक यांनी पुणे शहरावर दाखविलेला विश्वास या शहराने या शहरातील अनेक माणसांनी सार्थ ठरविला अशा कृतज्ञ भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.
आपण सर्वच जण खूप गोष्टी आपल्या मनात साचवत असतो. एखादा प्रसंग घडला की त्यावर किती विचार करायचा हे आपण आपले ठरवले पाहिजे. द्वेषामध्ये जळत राहायचे की तटस्थ, निर्विकार रहायचे हा निर्णय ज्याचा त्याला घ्यायचा असतो. यादरम्यान आपले मन हे कायम स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. विचाराचा परिणाम आपल्या शरीरावर होता कामा नये याची खबरदारी घ्या असा प्रेमळ सल्लाही मोडक यांनी यावेळी दिला. शाहू मोडक यांच्या सहवासात मला आयुष्याचे सार कळले, साध्वी असताना जेवढे आध्यात्मिक ज्ञान मिळाले त्याहून जास्त पतीच्या सहवासात मिळाले, त्यामुळे कायम त्यांची आठवण येत राहते अशा भावानाही त्यांनी व्यक्त केल्या.
साध्वी म्हणून जीवन जगत असताना आलेले अनुभव, लोकांचे मिळालेले प्रेम आणि पुढे शाहू मोडक यांची पत्नी म्हणून जवळून पाहता आलेली चित्रपट नगरी यांच्या आठवणी देखील त्यांनी सांगितल्या. सुप्रिया दामले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.